belgaum

महालक्ष्मीनगरमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करा -रहिवाशांची मागणी

0
166
 belgaum

बेळगाव लाईव्ह : लक्ष्मी टेकच्या पश्चिमेकडील महालक्ष्मीनगर परिसरातील लेआउटमधील मोकळ्या जागांचे संरक्षण करावे. तसेच कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी, तेथील रहिवाशांनी नव्याने स्थापन झालेल्या बेनकनहळ्ळी पट्टण पंचायतकडे केली आहे.

श्री गणेश मंदिर परिसरात झालेल्या आज शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत रहिवाशांनी बेनकनहळ्ळी पट्टण पंचायतीचे नव्याने नियुक्त मुख्य अधिकारी हलेश सुल्लण्णावर यांचा सत्कार करून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

यामध्ये नियमित पाणीपुरवठा, कचऱ्याची नियमित विल्हेवाट आणि परिसरातील विविध विकास कामांची अंमलबजावणी यांचा समावेश होता. बैठकीत रहिवाशांनी आरोप केला की कांही एजंट, दलाल लेआउटमधील राखीव मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून त्या विकण्याचा प्रयत्न करत आहेत.

 belgaum

सुमारे 600 हून अधिक निवासी बिगर शेती (एनए) भू-खंड असलेल्या या परिसरातील सार्वजनिक जागांचे संरक्षण करण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच, अधिकृत कचरा संकलन वाहनांना कचरा न देता रस्त्यांच्या कडेला टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली.

महालक्ष्मीनगर रहिवासी कल्याण संघटनेचे अध्यक्ष लुईस रॉड्रिग्स यांनी रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेत तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. बैठकीला संघटनेचे सदस्य उल्हास सावंत, शिवांगौडा मगदूम, मल्लिकार्जुन महालंक, अशोक पाटील, अनिल नवगेकर, समीर चाफोलकर, शंकर भेंडिगिरी, एरप्पा जिनगा, माजी उपाध्यक्ष माधुरी हेब्बाळकर, मोहन सांब्रेकऱ आणि अन्य उपस्थित होते.

मुख्य अधिकारी सुल्लण्णावर यांनी यावेळी परिसराला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींशी समन्वय साधून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. “मी नुकताच पदभार स्वीकारला असून सध्या पंचायत क्षेत्रातील सर्वेक्षण व नोंदी व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. रहिवाशांच्या समस्या टप्प्याटप्प्याने व शिस्तबद्ध पद्धतीने सोडवल्या जातील,” असे सुल्लण्णावर यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.