बेळगाव लाईव्ह : भविष्यातील अभियंत्यांनी जनतेच्या समस्यांना उपाय देणारी साधने शोधून काढून लोकांचे जीवन अधिक सुलभ आणि सोपे करावे, असे आवाहन बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
Visvesvaraya Technological University (व्हीटीयू), विश्वेश्वरय्या संशोधन व नवोन्मेष फाउंडेशन (व्हीआरआयएफ) आणि एरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान संगम येथे आयोजित “विन्यास” या विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी प्रकल्प प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी केवळ सैद्धांतिक शिक्षण नव्हे तर प्रात्यक्षिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची प्रकल्प प्रदर्शने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतील, असे ते म्हणाले.
“प्रकल्प हे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून न राहता ते लोकांच्या समस्यांना उत्तर देणारे असावेत. कोणत्याही क्षेत्रात गेल्यावर विविध समस्या असतात. त्या समजून घेत तंत्रज्ञानाद्वारे त्यावर उपाय कसे देता येतील हे दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे जनजीवन अधिक सोपे व सुलभ होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

व्हीटीयूचे कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत. इनोव्हेशन डिझाईन थिंकिंग (आयडीटी)च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रेयांकन दिले जाते. सादर प्रकल्पांपैकी उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करून त्यांना मोठ्या स्तरावर नेण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. पुढे दरवर्षी अशा प्रकारचे प्रकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला व्हीटीयूचे कुलसचिव प्रा. प्रसाद रामपुरे, व्हीआरआयएफचे ऑपरेशन्स विभाग प्रमुख संतोष इट्टणगी, प्रा. डॉ. हरीश बेंडिगेरी आदी उपस्थित होते.
विविध प्रकल्पांचे अनावरण
व्हीटीयूच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयांतील प्रथम वर्षाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एकूण १२० प्रकल्प सादर केले. शेतकऱ्यांना मदत करणारी तण काढण्याची व बियाणे पेरणीची साधने, रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सहाय्य करणारी उपकरणे, हिवाळ्यातील बर्फाचे पाण्यात रूपांतर करणारे तंत्रज्ञान अशा विविध कल्पक प्रकल्पांचे प्रदर्शन करण्यात आले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाला भेट देत माहिती घेतली.





