बेळगाव लाईव्ह :क्रिकेट हा खेळ असा आहे की जो तुम्ही जितका शिकाल तितका कमी आहे. तेंव्हा चांगले शिकायचा, चांगले प्रामाणिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करून मेहनत घेतल्यास यश निश्चितपणे मिळते. आपल्यासह आपला संघ व आपल्या गावाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर कसा वाढेल, आपल्या आई वडिलांचे स्वप्न कसे साकार करता येईल यावर लक्ष केंद्रित करा, असा संदेश मूळ गाव मांगले तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगलीचा (मुंबई) सुप्रसिद्ध राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू वंडर बॉय विजय पावले याने बेळगावच्या उदयान्मुख क्रिकेटपटूंना दिला.
बेळगावमध्ये मुरुगेंद्रगौडा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मुरुगेंद्रगौडा करंडक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत युवा उद्योजक शिवराज जाधव आणि विनायक कुंभार यांच्या मालकीच्या असलेल्या पांडुरंग सीसी या संघातून खेळण्यासाठी सरदार मैदानावर आलेल्या विजय पावले याची बेळगाव लाईव्हच्या रिपोर्टरने मंगळवारी भेट घेऊन संवाद साधला असता तो बोलत होता.
राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू विजय पावले याने टेनिस बॉल क्रिकेट मधील आपल्या सहभागाबद्दल बोलताना सांगितले की, सध्या मी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट मधील नावाजलेला खेळाडू असलो तरी इथपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास खूपच खडतर होता. आता टेनिस बॉल क्रिकेटला देखील व्यावसायिक स्वरूप प्राप्त होऊ लागल्यामुळे खेळाडूंना अनेक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तुमचे खेळावर प्रभुत्व असेल, खेळात तुम्ही पारंगत असाल तर पूर्वीच्या तुलनेत आघाडीवर पोचण्याचा प्रवास तितकासा खडतर नाही मात्र युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करावयास हवे.
माझ्या गावात क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय असल्यामुळे लहानपणापासूनच या खेळायची मला आवड निर्माण झाली. गावातील मातब्बर खेळाडूंचा खेळ पाहून एक दर्जेदार क्रिकेट खेळाडू बनण्याची प्रेरणा मला मिळाली. आमच्यासारख्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांची कारकीर्द घडवणाऱ्या क्रिकेटप्रेमीबद्दल बोलायचे तर बेळगावच नव्हे, तर संपूर्ण भारतातील क्रिकेटप्रेमींमुळेच आज आम्ही नावारूपास येत आहोत.

आयएसपीएलच्या अनुभवाबद्दल बोलताना सदर राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हणजे आमच्यासारख्या खेळाडूंसाठी मोठी उपलब्धी आहे असे त्यांने सांगितले. दीपक चौहान, सचिन तेंडुलकर, आशिष शेलार, अमोल काळे वगैरेंसह त्यांच्या कोर कमिटीने देशामध्ये ‘आयएसपीएल’ची जी संकल्पना उभारली आहे त्यामुळे आमच्यासारख्या टेनिस बॉल क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध झाले आहे अशी प्रांजळ कबुली देऊन बेळगाव येथे क्रिकेट खेळण्याचा अनुभव देशात इतर ठिकाणी क्रिकेट खेळण्याच्या तुलनेत काही वेगळाच असल्याचे विजय पावले यांनी सांगितले गेल्या पंधरा वर्षापासून मी बेळगाव मध्ये येऊन क्रिकेट खेळत आहे या कालावधीत आमच्या संघाने चांगले यशही मिळवले आहे आज टेनिस बॉल क्रिकेटचे होत असलेले व्यावसायिकीकरण पाहता या क्रिकेटमध्ये देखील चांगली कारकीर्द आहे. मात्र या क्रिकेट कारकिर्दीसाठी तुम्हाला कमी वेळात आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागेल.
भविष्यात आयएसपीएल प्रमाणे अनेक स्पर्धा येत राहणार आहेत. सध्या आयएसपीएलने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा फायदा होतकरू क्रिकेटपटुनी योग्यरित्या घेतल्यास त्यांची कारकीर्द घडून जाईल, असा विश्वास व्यक्त करून पूर्वीच्या तुलनेत आजच्या होतकरू युवा क्रिकेटपटूंसाठी आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा अचूक फायदा त्यांनी घ्यावा, असे पावले म्हणाला.
आजच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संदेश देताना विजय पावले म्हणाला की, चांगले क्रिकेट, चांगले क्रिकेटपटू तुमच्यासमोर आहेत, स्वतःला लहान-मोठा असे न समजता क्रिकेट खेळ सर्वांगाने आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे की जो तुम्ही जितका शिकाल तितका कमी आहे. तेंव्हा चांगले शिकायचा, चांगले प्रामाणिक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करून मेहनत घेतल्यास यश निश्चितपणे मिळते. आपल्यासह आपला संघ व आपल्या गावाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर कसा वाढेल, आपल्या आई वडिलांचे स्वप्न कसे साकार करता येईल यावर उदयोन्मुख खेळाडूंनी लक्ष केंद्रित करावे. बेळगावमधील पाहुणाचाराबद्दल भरभरून बोलताना इथे आम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही. आम्ही जणू आमच्या स्वतःच्या गावात आहोत असे आम्हाला वाटते.
येथील लोक खूपच प्रेमळ असून आम्हाला ते आपल्या कुटुंबातील एक मानतात, त्यासाठीच आमचे बेळगावशी जवळचे नाते झाले आहे. देशात एकाच वेळी बेळगावसह बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यावेळी आम्ही कांही जण सर्वप्रथम बेळगाव मधील क्रिकेट स्पर्धा खेळण्यास प्राधान्य देत असतो. याला कारण येथील पाहुणाचारच नव्हे, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणचे आमची ऊर्जा वाढवणारे क्रिकेटमय वातावरण होय. बेळगाव क्रिकेट खेळण्याचा आनंदच काही वेगळा असतो, असे पावले याने सांगितले.
बेळगाव येथील आपले संघ मालक शिवराज जाधव आणि विनायक कुंभार यांच्याबद्दल बोलताना आम्हाला शिवराजदादा आणि विनायकअण्णा यांचे प्रोत्साहन, पाठिंबा हा खेळाडू म्हणून नाही तर स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतो. आम्ही देशभरात क्रिकेट खेळतो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला पुरस्कृत खेळाडू म्हणून वागणूक दिली जाते. तथापि बेळगावमध्ये शिवराजदादा आणि विनायकअण्णा आम्हाला मोठ्या भावासारखी वागणूक देतात. त्यामुळे त्यांच्या संघातून खेळताना आपण पुरस्कृत खेळाडू म्हणून खेळत आहोत असा विचारही आमच्या मनाला शिवत नाही. आम्ही आमच्या कुटुंबाच्या संघातूनच खेळतो असे आम्हाला वाटते.
जेवणखाण निवासापासून सर्व बाबतीत आमची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते. शिवराज जाधव आणि विनायक कुंभार हे दोघेही अतिशय चांगली व्यक्तिमत्वं आहेत. हे उभयता परगाव, परराज्यातील दर्जेदार खेळाडू बेळगावात आणून स्थानिक होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्याचे, अप्रत्यक्षरीत्या क्रिकेटमध्ये त्यांना चांगला मार्ग दाखवण्याचे, एवढेच नव्हे तर बेळगावचे क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचे कार्य करत आहेत, असे मत मुंबईचा स्टार टेनिस बॉल क्रिकेटपटू विजय पावले याने शेवटी व्यक्त केले.



