belgaum

काँग्रेस रोडवरील ‘तो’ स्पीड ब्रेकर ठरला अखेर जीवघेणा

0
1439
 belgaum

बेळगाव लाईव्ह :गोगटे सर्कल येथून टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटकडे जाणाऱ्या काँग्रेस रोडवरील मराठा कॉलनी जवळील वारंवार इशारा देण्यात आलेला तो धोकादायक गतिरोधक (स्पीड ब्रेकर) अखेर जीवघेणा ठरला असून गेल्या रविवारी या स्पीड ब्रेकरमुळे घडलेल्या दुचाकी अपघातातील गंभीर जखमी महिलेचे दुर्दैवाने आज उपचाराचा फायदा न होता निधन झाले आहे.

जीव गमावलेल्या महिलेचे नांव सरिता राजाराम कालकुंद्रीकर (वय 64) असे असून त्या फर्स्ट मेन, 4 क्रॉस, शिवाजीनगर बेळगाव येथील रहिवासी होत्या. सरिता या गेल्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगरहून टिळकवाडी येथील एका नातेवाईकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुचाकीवर मागे बसून जात होत्या.

त्यावेळी मराठा कॉलनी क्रॉस येथे चिन्हांकित (मार्किंग) नसलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्यामुळे तो ओलांडताना भरधाव दुचाकीला दणका बसून मागे बसलेल्या सरिता रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले तीन दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडं असा परिवार आहे.

हा तोच गतिरोधक आहे जो कोणत्याही प्रकारे चिन्हांकित (मार्किंग) केलेला नाही. त्याला रिफ्लेक्टर नाहीत, इशारा देणारा फलक नाही. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी वारंवार इशारा देऊन प्रशासनाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारीच सदर गतिरोधकाच्या ठिकाणी आणखी 2 अपघात झाले असून स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक गतिरोधकामुळे संबंधित ठिकाणी दररोज दोन-चार दुचाकी अपघात घडत असतात.

विशेषतः गोगटे सर्कलपासून पहिल्या गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आतापर्यंत लोक जखमी होण्यावर निभावत होते, मात्र आता एक जीव गेला आहे. तेंव्हा प्रशासनाला आणखी किती इशारे हवे आहेत? आणखी किती अपघातांची वाट पाहणार? ‘पुढे गतिरोधक आहे’ हा फलक बसवण्याचा मूलभूत संकेत न पाळता रस्त्यावर गतिरोधक घालण्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल वाहन चालक आणि नागरिकांमधून केला जात आहे.

याबद्दल प्रसिद्धी माध्यमांनी अनेक वेळा आवाज उठवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेले नाही. गतिरोधकाला रंग नाही, सूचना नाही, परिणामी आता एका कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.