बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट वगैरे सर्व जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टरवरील, विशेष करून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील गाणी आणि संगीताचा दणदणाट करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर तात्काळ बंदी घालण्यात यावी. त्याचप्रमाणे याबाबतीत कोणतीही कारवाई न करणाऱ्या संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रामदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौड पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासह धरणे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
ट्रॅक्टर, विशेष करून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्यावर मोठमोठ्याने गाणी लावून ये -जा करत असतात. त्यामुळे अशांतता निर्माण होऊन नागरिकांना त्रास तर होतोच, त्याशिवाय मोठ्या आवाजातील गाणी, संगीतामुळे खुद्द ट्रॅक्टर चालकाला देखील आसपास काय घडते हे ऐकू येत नाही.
पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा हॉर्न ऐकू न आल्यामुळे कित्येक अपघात होऊन लोकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर वर साऊंड सिस्टिम बसवण्यास बंदी घालण्यात यावी यासाठी रामदुर्गच्या ओबळापूर गावातील श्रीनिवासगौड पाटील हे गेल्या दोन महिन्यापासून आवाज उठवत आहेत.
यासाठी त्यांनी राज्याच्या परिवहन खात्याचे आयुक्त, बेळगाव विभागाचे प्रादेशिक परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, बेळगाव पोलीस आयुक्त वगैरे संबंधित सर्वांना निवेदने सादर केली आहेत. तथापि आज पर्यंत परिणामकारक ठोस अशी कोणतीच कारवाई झालेली नाही.

पोलीस प्रशासनाकडून मात्र पाटील यांच्या मागणीची थोडीफार दखल घेण्यात आली असून साऊंड सिस्टिम असलेल्या ट्रॅक्टर चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र अजूनपर्यंत बंदीची कारवाई करण्याचा आल्यामुळे सार्वजनिक शांतता भंग करत गाण्याचा दणदणाट करणारे ट्रॅक्टर गावागावात फिरताना दिसत आहेत.
परिणामी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी निर्वाणीचा उपाय म्हणून श्रीनिवासगौड पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला शेतकरी संघटना व माजी सैनिक संघटनेने पाठिंबा दिला असून त्यांच्या पदाधिकारी सदस्यांनी पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह सुरू केला आहे.
आंदोलनस्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नायक आणि माजी सैनिक महेशकुमार यांनी श्रीनिवासगौड पाटील यांच्या मागणीबद्दल माहिती दिली. तसेच अतिशय रास्त असणाऱ्या या मागणीकडे प्रशासन विशेष करून प्रादेशिक परिवहन खात्याचे (आरटीओ) अधिकारी तशाप्रकारे दुर्लक्ष करत आहेत हे स्पष्ट करताना पाटील यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन खात्याच्या संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे नायक आणि महेशकुमार यांनी स्पष्ट केले.




