बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील शांताई वृद्धाश्रम येथे येत्या बुधवार दि. 4 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामी समर्थ आणि श्री विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती प्रतिष्ठापना आणि नव्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी दिली.
माजी महापौर विजय मोरे यांनी आज सोमवारी एका जाहीर व्हिडिओच्या अधिक माहिती देताना सांगितले की, येत्या बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता बामणवाडी गावापासून वृद्धाश्रमापर्यंत श्री स्वामी समर्थ आणि श्री विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येईल.
त्यानंतर सकाळी 11 वाजता मूर्ती प्रतिष्ठापना आणि नव्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे प्रसिद्ध व्यावसायिक अनिल जैन उपस्थित राहणार आहेत.
हा समारंभ समाप्त झाल्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसादाचे वितरण केले जाणार असून सायंकाळी 4 वाजता आजरा येथील वारकरी मंडळींचा भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
जनतेचे प्रोत्साहन आणि पाठिंबातून आजपर्यंत शांताई वृद्धाश्रमाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हे प्रेम असेच अखंड कायम राहो, असे सांगून उपरोक्त सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ते यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन माजी महापौर मोरे यांनी शेवटी केले.




