belgaum

पॉक्सो प्रकरणी आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

0
411
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या गजानन अण्णाप्पा पाटील (वय ३५) याला पॉक्सो न्यायालयाने ७ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी हा निकाल दिला असून पीडितेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आरोपीला पकडणे शक्य झाले.

मारुती नगर परिसरात ११ जुलै २०२३ रोजी ही घटना घडली होती. आरोपी गजानन पाटील याने एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. तिला उचलून नेण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने प्रतिकार केल्यामुळे आरोपी तिला सोडून पळून गेला होता.

टिळकवाडी पोलीस निरीक्षक संतोष दळवाई यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सुनावणी दरम्यान ७ साक्षीदार आणि २७ कागदपत्रांच्या आधारे गजानन पाटील याच्यावरील आरोप सिद्ध झाले.

न्यायालयाने त्याला भादंवि कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंड, तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ८ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने पीडित मुलीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम ५ वर्षांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.