belgaum

बेळगाव बाजारपेठ वादाचा पेच आता बंगळुरूच्या दरबारी..

0
696
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या अनेक दिवसांपासून बेळगावमधील गाजत असलेल्या ‘जय किसान’ खासगी भाजी मार्केट आणि एपीएमसी (APMC) यांच्यातील वादाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणावर स्थानिक पातळीवर तोडगा निघत नसल्याने, आता थेट राज्याची राजधानी बंगळुरू येथे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन, लवकरच व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह बंगळुरूमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला.


बेळगावमधील भाजी व्यापाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याने हा वाद चिघळला आहे. एपीएमसीमधील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे मार्केट उभारले असताना, ‘रविवारच्या शेतकरी बाजारा’तील व्यापाऱ्यांनी तिथे स्थलांतरित होणे बंधनकारक आहे. याउलट, जय किसान मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांना सध्याच्या ठिकाणीच व्यापार करण्याची परवानगी द्यावी किंवा त्या जागेला ‘एपीएमसी सब-मार्केट’ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी. या मागणीवरून बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत काही तांत्रिक मुद्द्यांवरून एपीएमसी व्यापारी आणि स्थानिक आमदारांमध्ये जोरदार वाद झाला. व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले की, जय किसान मार्केटचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत जिल्हा पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.

एपीएमसी आवारामध्ये व्यवसाय करणाऱ्या सरकारचे कर भरणे आवश्यक आहे त्याप्रमाणे संडे मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याने सरकारचे कर भरणा करावे. आणि सध्याच्या घडीला त्यांनी व्यापार करण्यास एपीएमसी ने सोय करून द्यावी. अशी सूचना देखील जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली.

भाजी मार्केटसोबतच बेळगावमधील फुल व्यापाऱ्यांमधील ‘जुने विरुद्ध नवीन’ हा संघर्षही आता तार्किक अंताकडे पोहचला आहे. अशोकनगर येथील घाऊक बाजारपेठेत नवीन ३६ गाळे निर्माण करून, त्यांचे पारदर्शक पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरलेल्या फुल व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीत माहिती दिली की, अशोकनगर मार्केटमधील ३६ गाळ्यांसाठी पुढील ७ ते १० दिवसांत अल्पमुदतीची निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. हे गाळे २ वर्षांच्या करारावर दिले जातील. ज्या व्यापाऱ्यांकडे एपीएमसीचा अधिकृत परवाना आहे, त्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, नवा-जुना असा भेदभाव न करता सर्वांना व्यापाराची संधी द्यावी, मात्र जुन्या व्यापाऱ्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना प्राधान्य देण्यात यावे.


​या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि एपीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भाजी मार्केटच्या वादावर अंतिम मोहोर उमटवण्यासाठी आता लवकरच मंत्री सतीश जारकीहोळी आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील यांच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये संयुक्त बैठक पार पडणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.