बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथे वर्चस्वाच्या वादातून दत्तात्रय थोरात यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
राजकीय आणि संघटनात्मक कामातील वाढत्या प्रभावामुळे झालेल्या वादातून हा खुनी हल्ला करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील संशयितांचाही सहभाग आहे. २३ फेब्रुवारी रोजी दत्तात्रय थोरात आणि श्रीकांत ऊर्फ पिंटू परीट हे दुचाकीवरून जात असताना निडसोसी रोडवर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना धडक दिली.
त्यानंतर थोरात यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून समीर तुकाराम पाटील आणि शामराव यादव यांनीच हा कट रचल्याचे समोर आले आहे. संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये थोरात यांचा वाढता प्रभाव समीर पाटील याला सहन होत नसल्याने त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि इचलकरंजी येथील गुंडांना सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणला.
या कारवाईत पोलिसांनी शामराव ऊर्फ शाम यादव (३५, संकेश्वर), सुनील अशोक पांडव (२७, हातकणंगले), सूरज बाळासाहेब वैद्य (३१, कबनूर), समीर तुकाराम पाटील (४५, संकेश्वर), संकेत उमेश मेत्री (२७, इचलकरंजी), अशोक विलास पाटील (५८, हरगापूरगड) आणि संतोष धोंडिबा शेलार (३०, हरगापूरगड) या सात जणांना अटक केली आहे.
संकेश्वर पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक तलवार आणि ३ मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणात अद्याप दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तातडीने छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.




