बेळगाव लाईव्ह : रायबाग तालुक्यातील बुदिहाळ येथे सार्वजनिक रस्त्यावर ट्रॅक्टरद्वारे जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि इतरांच्या जिवाशी खेळणाऱ्या या स्टंटबाजांमुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती.
१८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास विठ्ठल अक्कीवाटे, सचिन अक्कीवाटे आणि वसंत अक्कीवाटे या तिघांनी सिद्धप्पा लट्टे यांच्या घरासमोर ट्रॅक्टरचा मोठा आवाज करत धुमाकूळ घातला. ट्रॅक्टरचे पुढचे चाक हवेत उचलून (व्हीलिंग) भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांनी सार्वजनिक शांततेचा भंग केला.
या प्रकारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. जेव्हा स्थानिक रहिवासी सिद्धप्पा लट्टे यांनी या धोकादायक कृत्याला विरोध केला, तेव्हा आरोपींनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली.
आरोपींच्या उद्धट वर्तनानंतर लट्टे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात रायबाग पोलिसांनी बुदिहाळ येथील विठ्ठल अक्कीवाटे, सचिन अक्कीवाटे आणि वसंत अक्कीवाटे अशा एकूण तिन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रायबाग पोलिसांनी त्वरित दखल घेत तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांना हा पोलिसांचा कडक इशारा मानला जात असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.




