बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील खासबाग आणि जैतनमाळ येथे सार्वजनिक ठिकाणी मटका जुगारावर लोकांचे पैसे लावणाऱ्या दोघा मटका बुकिंना काल सोमवारी पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या मटका बुकिंगची नावे अभिषेक उर्फ जिम्या राम अंजनेयकर (वय 25, रा. महाद्वार रोड बेळगाव) आणि अडिवेप्पा दुर्मप्पा कोरवी (वय 28, रा. मार्कंडेयनगर केंचनट्टी ता. बेळगाव) अशी आहेत. यापैकी अभिषेक हा माळी चौक, खासबाग येथे सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका या जुगारावर लोकांचे पैसे लावत असताना शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसवा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.
तसेच त्याच्याकडील मटक्याचे साहित्य जप्त केले. पोलीस चौकशीत अभिषेक याने जुगारासाठी गोळा केलेले लोकांचे पैसे आपण सुरेश गणेश जालगार (वय 36, रा. समर्थनगर बेळगाव) याच्याकडे जमा करत असल्याची माहिती दिली.
त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दुसऱ्या प्रकरणात आरोपी अडिवेप्पा हा जैतनमाळ, शबरी कॉलनी जवळ सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका नामक जुगाराचा अड्डा चालवत होता.
याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागणगौडा कट्टीमणीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून अडिवेप्पा कोरवी याला अटक केली. तसेच त्याच्याविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
गोव्याच्या दारूची बेकायदा विक्री करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
फक्त गोवा राज्यातच विक्रीची परवानगी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची बेळगावात विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना काल बेळगाव ग्रामीण पोलिसांनी संतीबस्तवाड येथे अटक करून त्यांच्या जवळील 14.04 लिटर बेकायदेशीर दारू जप्त केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे दयानंद कामन्ना करंबळकर आणि विशाल मंडलिक कोडचवाडकर (दोघेही रा. शिवाजीनगर खानापूर, ता. जि. बेळगाव) अशी आहेत. हे दोघे फक्त गोवा राज्यातच विक्रीची परवानगी असलेल्या गोवा बनावटीच्या दारूची बामणवाडी क्रॉस जवळ संतीबस्तवाड गावाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी विक्री करत होते.
याबाबतची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दयानंद आणि विशाल या दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडील डीएसपी ब्लॅक कंपनीची 180 मि.लि.च्या बाटल्यांमध्ये भरलेली 14.04 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त केली. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




