बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा पोक्सो न्यायालयाने ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
आकाश भरतकुमार डोडिया (वय २३, रा. कल्मेश्वर नगर, कंग्राळी बुद्रुक ) असे या नराधमाचे नाव असून, त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १४ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपी आकाशने पीडित अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले होते. लग्नाचे आमिष दाखवून अहमदाबाद (गुजरात) येथे नेऊन पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले.
याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खडेबाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त ए. चंद्रप्पा यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
विशेष जलदगती पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणातील साक्षी-पुरावे तपासून आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला ३० वर्षांच्या तुरुंगवासासह १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. जर आरोपीने दंडाची रक्कम भरली नाही, तर त्याला अतिरिक्त २ वर्षे कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयाने पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम पीडितेच्या भविष्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत ५ वर्षांकरिता मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद केला.



