बेळगाव लाईव्ह :शहापूर -खासबाग येथील आठवडी बाजारामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर या बाजाराला शिस्त लागावी, तसेच विक्रेते व नागरिकांची सोय व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरसेवक रवी साळुंके यांच्या पुढाकाराने आज शनिवारी सकाळी बाजाराच्या ठिकाणी पिवळ्या ऑइल पेंटने शाश्वत आरेखन करण्यात आले.
शहापूर -खासबाग येथील रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण, विक्रेत्यांची नियोजन शून्य बसण्याची व्यवस्था, वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. याची दखल घेत शहापूर प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक रवी साळुंके यांच्या पुढाकाराने सदर बाजारात शिस्त निर्माण करण्याच्या प्रयत्नांना गेल्या महिन्यापासून प्रारंभ झाला आहे.
त्यावेळी विक्रेत्यांनी आपल्याला जागा नेमून देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार गेल्या जवळपास महिनाभर आठवडी बाजाराच्या दिवशी नगरसेवक रवी साळुंके यांच्या उपस्थितीत रस्त्यावर चुन्याच्या रेषा ओढून आलेखन करण्याद्वारे आरेखनानुसार विक्रेत्यांना जागा नेमून दिल्या जात आहेत. त्यामुळे बाजाराला शिस्त लागून रस्ता देखील प्रशस्त राहत आहे.

बेळगाव शहरातील दर रविवारी भरणारा हा खासबागचा आठवडी बाजार शहरातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो बाजार गल्ली खासबाग परिसरात दोन-तीन गल्ल्यांमध्ये हा बाजार भरत असतो गेल्या काही महिन्यात रहदारीला अडथळा आणि होणाऱ्या गर्दीमुळे दर रविवारी अनेकांचे मोबाईल चोरीला जात होते मात्र नगरसेवक रवी साळुंखे यांच्या माध्यमातून रहदारी पोलिसांनी तात्पुरते आराखण केले होते त्यामुळे मोबाईल चोरीची संख्या देखील कमी झाली होती मात्र आता पिवळ्या रंगाने कायमस्वरूपी आलेखन केल्याने या भागातील नागरिकत समाधान व्यक्त होत आहे.
या बाजारात चुन्याने केलेले आरेखन शाश्वत रहात नसल्यामुळे दर आठवड्याला ते नव्याने करण्याचे श्रम घ्यावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने नगरसेवक रवी साळुंके यांच्या देखरेखीखाली आज शनिवारी सकाळी आठवडी बाजाराच्या रस्त्यावर पिवळ्या ऑइल पेंटने पक्के शाश्वत आरेखन करण्यात आले. नगरसेवक साळुंके यांच्या या सुधारित कृतीबद्दल भाजीपाला विक्रेते, पादचारी आणि वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत होते




