belgaum

बेळगावकरांच्या सेवेत १० कोटींच्या ११ नवीन बसेस; १०० ई-बसेसनाही मंजुरी

0
126
 belgaum

बेळगाव लाईव्ह :वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे नाव बदलून ते आता ‘कित्तूर राणी चन्नम्मा परिवहन’ असे करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शनिवारी बेळगावात या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली असून, तसा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मंडळाच्या २८ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय बसस्थानकावर आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. बेळगाव शहरासाठी १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी ५ कोटी रुपये खर्चाच्या ११ बसेस आजपासून सेवेत दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी २४ वातानुकूलित व विना-वातानुकूलित स्लीपर कोच बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावला २५० नवीन बसेस देऊन जनतेची गरज पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले की, सरकारने आतापर्यंत ७,८०० नवीन बसेसची खरेदी केली असून १० हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगावच्या हक्काच्या सुविधा मिळवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली.

या कार्यक्रमात सलग अनेक वर्षे अपघातरहित आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या ६८ चालकांचा मान्यवरांच्या हस्ते ‘रौप्य पदक’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच १८८ नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

राज्यातील ‘शक्ती योजने’मुळे कर्नाटक परिवहन मंडळाच्या महिला प्रवासी संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. दररोज लाखो महिला या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे बसस्थानके आणि गाड्या प्रवाशांनी खच्चून भरलेल्या दिसत आहेत. मात्र, या वाढलेल्या प्रवासी संख्येचा थेट परिणाम विद्यार्थी आणि इतर प्रवाशांवर झाला असून, सध्याच्या साधनसामग्रीवर मोठा ताण पडत आहे. अनेक मार्गांवर बसेसची कमतरता आणि गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हीच वाढती निकड आणि प्रवाशांचा वाढलेला भार पेलण्यासाठी नव्याने वाढलेल्या बसची संख्या निश्चितच फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.