belgaum

बस स्थानकात स्वच्छतेचा कहर… प्रवाशांचा संताप

0
116
 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या बेळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानकात सध्या अस्वच्छतेचे तांडव पाहायला मिळत आहे. येथील शौचालयांची कमालीची दुरवस्था झाली असून परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक प्रशासनाला अक्षरशः शिव्याशाप देत आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ४९.८ कोटी रुपयांच्या निधीतून बेळगावमध्ये हायटेक बसस्थानक उभारण्यात आले आहे. येथे सर्व सोयींनी युक्त शौचालये बांधल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला होता, मात्र आता हेच ठिकाण अव्यवस्थेचे माहेरघर बनले आहे. स्वच्छतेअभावी विद्यार्थी, नागरिक आणि चालक-वाहकांचे देखील हाल होत आहेत.

स्वच्छतेचे कंत्राट घेतलेला कंत्राटदार काम सोडून गेल्याने गेल्या महिन्याभरापासून येथे साफसफाई झालेली नाही. परिणामी, मुताऱ्या तुंबल्या असून मैलापाणी बाहेर वाहत आहे. त्यामुळे या परिसराला रोगराईचे केंद्र बनण्याची भीती निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे प्रवाशांना उभे राहणेही कठीण झाले आहे. या स्थानकातून ५७ पेक्षा जास्त मार्गांवर बसेस धावतात आणि दररोज लाखांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. सद्यस्थितीत केवळ एकच शौचालय उघडे असून दुसऱ्याला टाळे ठोकण्यात आले आहे. त्यातच कचराकुंड्या ओसंडून वाहत असल्याने संपूर्ण बसस्थानक धुळीने आणि कचऱ्याने माखले असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

स्थानकातील अस्वच्छतेबद्दल बोलताना शिवशंकर चनगौडा या विद्यार्थ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. शौचालये साफ नसून सगळीकडे कचरा पसरला आहे आणि प्रशासनाचे याकडे अजिबात लक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले. दररोज कॉलेजला ये-जा करण्यासाठी याच स्थानकाचा वापर करावा लागतो, मात्र शौचालयातील घाण पाहून आत जाण्याची सोय उरलेली नाही, अशी प्रतिक्रिया अभिषेक बडिगेर या विद्यार्थ्याने दिली. बसस्थानकाच्या नवीन इमारतीमुळे आम्हाला स्वच्छतेची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात शौचालयांची चिखलासारखी अवस्था झाली असून सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे, अशा शब्दांत प्रवासी नागेश कोणी यांनी आपला संताप व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगाव बसस्थानकाचा कायापालट झाल्याचा दावा केला जात असला तरी, वास्तव मात्र अत्यंत भीषण आहे. प्रवाशांच्या मूलभूत गरजा असलेल्या शौचालयांची आणि पिण्याच्या पाण्याची सोयही राखता येत नसेल, तर या कोट्यवधींच्या निधीचा उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे केव्हा लक्ष देऊन प्रवाशांची या नरकयातनेतून सुटका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संदर्भात कॉलेज विद्यार्थी शिवशंकर चनगौडर यांनी सांगितले की, “शौचालयांची नियमित स्वच्छता होत नाही. सर्वत्र कचरा पडलेला आहे. पाण्याची सोय असूनही कोणी लक्ष देत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून स्वच्छता करावी.”

दररोज या बसस्थानकातून कॉलेजला जाणारे अभिषेक बडिगेर म्हणाले, “शौचालयात जाण्याचीही भीती वाटते. इतकी घाण आहे. संपूर्ण बसस्थानक अस्वच्छ झाले आहे. प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी.”

प्रवासी नागेश कोणी यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले, “कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक सीबीटी उभारले, पण प्रत्यक्षात येथे पाय ठेवताच परिस्थिती वेगळी दिसते. शौचालयांतून दुर्गंधी येते, मुताऱ्यांत घाण साचली आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारावी.”

एकूणच, कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या आधुनिक बसस्थानकात मूलभूत स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन स्वच्छता व देखभालीची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.