बेळगाव लाईव्ह:बेळगावच्या क्लब रोड परिसरात बिबट्या वावर आढळला नसल्याचे वन विभागाचे स्पष्टीकरण बेळगावच्या वन विभागाने दिले आहे.
शहरातील क्लब रोड परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवांवरून वन विभागाने राबवलेल्या शोधमोहीमीत दुसऱ्या दिवशीही बिबट्याचा वावर असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याची माहिती विभागीय वनाधिकारी (DFO) एन. ई. क्रांती यांनी दिली.
मंगळवारी वन विभागाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, शहरातील क्लब रोडवरील गोल्फ कोर्स, हिंडलगा मार्गालगतच्या मोकळ्या जागांमध्ये चित्ता फिरत असल्याच्या काही अफवा पसरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारीच शोधमोहीम सुरू केली होती.

मात्र, सलग दोन दिवसांच्या पाहणीदरम्यान कुठेही बिबट्याच्या पायांचे ठसे, हालचालींचे संकेत किंवा इतर कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे सध्या तरी शहरात बिबट्या किंवा अन्य कोणत्याही वन्य प्राणी असल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, असे डीएफओ क्रांती यांनी स्पष्ट केले.
तरीही नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास थेट वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.



