बेळगाव लाईव्ह :मुतगा (ता. बेळगाव) : सन २००३ पासून सुरू असलेला मुतगा येथील भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मुख्य रस्त्यावर बाजार भरू लागल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे महत्त्वपूर्ण निर्णय घेत बाजाराचे पुनर्नियोजन केले आहे.
या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त भूषण बोरसे, सीपीआय आय.आर. पट्टणशेट्टी, ग्रामपंचायत पीडीओ बसवंत कडेमनी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष उमेश पुरी, पिंटू यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील जागेत यापुढे भाजीपाला बाजार न भरवता त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रविवारचा साप्ताहिक भाजीपाला बाजार हनुमान मंदिर परिसर, चव्हाट गल्ली, चावडी गल्ली आणि मारुती गल्ली या नियोजित भागात भरवण्यात येणार आहे.
यापुढे भाजीपाला विक्रेत्यांनी केवळ प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेतच बाजार भरवावा, अन्यत्र रस्त्यावर दुकाने थाटू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




