बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या क्रिकेट शौकिनांसाठी पर्वणी असलेल्या भव्य बक्षीस रकमेच्या ‘श्री मुरगेंद्रगौडा एस. पाटील करंडक -2026’ पहिल्या सत्रातील अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी शहरातील सरदार मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला.
स्पर्धेचे पुरस्कर्ते एम.पी. फाउंडेशनचे संस्थापक आणि भाजप नेते ॲड. मुरगेंद्रगौडा एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभास कारंजीमठाचे प.पु. श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लावले होते. केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविकानंतर भारत मातेच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा मानाचा फेटा बांधून तसेच शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पूज्य श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांना देखील विशेष सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना अविनाश पोतदार यांनी बेळगावचा वेगाने विकास व्हावयाचा असेल तर या ठिकाणी आयपीएलचे सामने झाले पाहिजेत, ते शक्य देखील आहे. कारण आपल्याकडे ऑटोनगर येथे केएससीएचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लडलाईट वगैरे काही आवश्यक सुधारणा वगळता सुसज्ज असे क्रिकेट स्टेडियम आहे. क्रिकेट सामने टीव्हीवर पाहणे आणि प्रत्यक्ष मैदानावर पाहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यासाठीच बेळगावमध्ये आयपीएल सामने व्हावे त्यासाठी माझे देखील सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
भारतामध्ये क्रिकेट हा खेळ जणू एका धर्माप्रमाणे असून क्रिकेटपटू हे देवा समान आहेत. ऑस्ट्रेलियाचे लोक कधी कोणाचे कौतुक करत नाहीत. मात्र त्यांचा एक खेळाडू मॅथ्यू हेडन याने एक वक्तव्य केला आहे, त्याने “सचिन तेंडुलकर याच्यामध्ये आपण देव पाहिला” असे म्हंटले आहे. यासाठी आपण सर्वांनी क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. या स्पर्धेचे आयोजक ॲड. मुरूगेंद्रगौडा पाटील त्या कामाला लागलेच आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे सांगून या स्पर्धेच्या आयोजकांसह कोणी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असेल तर त्यांना मी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे, असे अविनाश पोतदार यांनी सांगितले.
श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी देखील क्रिकेटच्या लोकप्रियतेवर भाष्य करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या भाषणानंतर मैदानावर स्वामीजींच्या हस्ते स्वामीजी आणि आमदार पाटील यांच्या हस्ते यष्टी पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडाटात रंगीबिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. उद्घाटन समारंभनंतर मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून हेस्कॉम खाते आणि एक्स इंडियन आर्मी या संघांमधील प्रदर्शनीय सामन्याने स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटन समारंभप्रसंगी शहरातील नेतेमंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींसह बहुसंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. ‘श्री मुरगेंद्रगौडा एस. पाटील करंडक -2026’ पहिल्या सत्रातील अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशभरातील 40 क्रिकेट संघानी सहभाग दर्शवला आहे. यापैकी कांही संघांमधून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) स्पर्धा खेळणारे मातब्बर क्रिकेटपटू बेळगावात आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत.




