belgaum

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाने केली हत्या

0
1132
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून एका तरुणाने एका ४९ वर्षीय व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

हत्या केल्यानंतर आरोपीने दाखवलेल्या विकृत मानसिकतेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून, आरोपीने मृतदेहावर पाय ठेवून काढलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बसवराज होसमनी असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बसवराज याचे गावातीलच एका महिलेशी सूत जमले होते, अशी माहिती समोर येत आहे. या संबंधांची माहिती त्या महिलेचा मुलगा ईरय्या मठपती याला मिळाल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून बसवराजवर सूड उगवण्याच्या तयारीत होता. याच वादातून सोमवारी रात्री त्याने बसवराजचा बळी घेतला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हुलीकट्टी गावाजवळील सवदत्ती-रामदुर्ग मार्गावर बसवराज होसमनी यांची दुचाकी ईरय्याने अडवली. काही कळण्याच्या आतच त्याने चाकूने बसवराज यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, केवळ हत्या करून आरोपी थांबला नाही, तर त्याने मृताच्या छातीवर पाय ठेवून विजयाची पोझ दिली, ज्यामुळे या गुन्ह्यातील त्याचे क्रौर्य अधिकच स्पष्ट झाले.

सदर घटना सवदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेची माहिती मिळताच सवदत्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी ईरय्याला बेड्या ठोकल्या आहेत. भररस्त्यात घडलेल्या या भीषण हत्याकांडाने हूलिकट्टी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.