बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी “आदर्श मराठी शाळा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. मातृभाषेतून शिक्षण देत विविध शैक्षणिक प्रयोग, उपक्रम आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बेळगाव व खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा यामध्ये गौरव करण्यात येणार आहे.
कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा “युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार 2025-26” यावर्षी 21 शाळांमधून निवडलेल्या खालील पाच शाळांना जाहीर करण्यात आला आहे:
- सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, हेमाडगा (ता. खानापूर, जि. बेळगाव)
- सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळा, विजयनगर-जांबोटी (ता. खानापूर, जि. बेळगाव)
- सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, देसूर (ता. जि. बेळगाव)
- सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा, हालगा (ता. जि. बेळगाव)
- सरकारी मराठी आदर्श शाळा, हिंडलगा (ता. जि. बेळगाव)
याशिवाय, सर्वच निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी करत शैक्षणिक यशाचे शिखर गाठणाऱ्या शाळांसाठी यंदापासून “ज्ञानशिखर सन्मान” पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षी हा सन्मान खालील दोन शाळांना जाहीर झाला आहे:
- सरकारी मॉडेल मराठी प्राथमिक शाळा, येळ्ळूर (ता. जि. बेळगाव)
- कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प बेळगाव
तसेच, मर्यादित साधनसामग्रीतही दुर्गम भागात दर्जेदार शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या उच्च प्राथमिक मराठी शाळा, जामगाव (ता. खानापूर, जि. बेळगाव) या शाळेला विशेष “ज्ञानज्योती पुरस्कार-2026” जाहीर करण्यात आला आहे.

सदर पुरस्कार वितरण सोहळा “मराठी भाषा गौरव दिन” निमित्त रविवार, 1 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी अभिनेते, लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी संबंधित शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, शालेय समिती सदस्य आणि पालकवर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावेत, असे आवाहन केले आहे.




