बेळगाव लाईव्ह : बडाल अंकलगी परिसरात झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कडक पवित्रा घेतला आहे. विनापरवाना झाडे तोडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी बडाल अंकलगी येथील ६०० एकर जमीन निवडण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेत सरकारी जागेवर विनापरवाना वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे.
ही गंभीर बाब असल्याचे सांगत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने तेथील काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल आणि वन विभागाने योग्य समन्वय राखूनच पुढील कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन आता महिलांच्या खात्यावर जमा झाले असून, आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला ५२ हजार रुपयांची मदत मिळाल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
तसेच, वाढत्या बालविवाहांवर चिंता व्यक्त करताना त्यांनी मोबाईल आणि टीव्हीच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. हे रोखण्यासाठी १४ फेब्रुवारीपासून सईदापूर मतदारसंघात ‘नो टीव्ही, नो मोबाईल’ ही मोहीम राबवून पालकांमध्ये जनजागृती करणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.





