बेळगाव लाईव्ह :मराठी राज्यभाषा दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने ऐतिहासिक राजहंस गडावर मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीसमोर मराठीचा सन्मान सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी एपीएमसी सदस्य व येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते वामनराव पाटील यांच्यासह महेश जुवेकर, धनंजय पाटील, राजू पावले, अशोक घगवे आदींच्या हस्ते गडावरील श्री सिद्देश्वर मंदिरात पूजा-आरती करून झाली.
त्यानंतर शिवाजी हावळाणाचे, खानापूर समितीचे नेते गोपाळ पाटील, धामणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे यल्लाप्पा रेमाणाचे, प्रकाश अष्टेकर, दत्ता उघाडे, मनोहर हुंदरे, मोतेश बारदेशकर, निलेश काकतकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पदपूजन करण्यात आले. यावेळी सिद्दाप्पा पुजारी यांनी मंत्रोच्चार केले.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, नगरसेवक व युवा समितीचे खजिनदार शिवाजी मंडोळकर, पांडुरंग सावंत, महादेव येळवी, शिवाजी जाधव, गुणवंत पाटील, रवी पाटील, संजय मोरे, एम.वाय. घाडी आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सीमाकवींचे प्रेरणादायी मार्गदर्शन
प्रमुख पाहुणे सीमाकवी रवींद्र पाटील यांनी “भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल; आणि संस्कृती टिकली तरच आपली अस्मिता जिवंत राहील,” असे ठाम प्रतिपादन केले. मराठीची अभिजात परंपरा, संतसाहित्याचा समृद्ध वारसा आणि सीमाभागातील मराठी बांधवांची जिद्द यांचा गौरव करत त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राजहंस गडावर दुमदुमलेला मराठीचा जयघोष हा केवळ उत्सव नसून मराठी अस्मितेचा जाज्वल्य संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी सादर करत सीमाभागातील मराठी भाषिक अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढत असल्याचे सांगितले. “मराठी माणूस हा या भूमीचा भूमिपुत्र आहे. आपल्या हक्कासाठी लढताना एकीची वज्रमुठ आवळणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

शिवसंत संजय मोरे यांनी शिवाजी महाराजांनी शिवकालीन व्यवहार मराठीतून सुरू करून भाषेला दिलेला मान अधोरेखित केला. जगात दहाव्या क्रमांकावर असलेली मराठी भाषा अधिक वैज्ञानिक व जागतिक पातळीवर सक्षम व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती (सीमाभाग) यांच्या वतीने १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘मराठी सन्मान यात्रा’ला शुभेच्छा देत सीमावासीयांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास इंद्रजित धामणेकर, रणजित हवळानाचे, बी.एन. मजुकर, दयानंद उघाडे, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, श्रीकांत नांदूरकर, सुरज गोरल, राकेश परीट, नेताजी गोरल, यलुपा पाटील, रमेश धामणेकर, सतिश धामणेकर, धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि सीमाभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




