बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोकणातील अस्सल हापूस आंबा अखेर बेळगावच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वप्रथम एम. बी. देसाई फ्रुट कंपनी येथे बुधवारी हापूसची आवक झाली. पहिल्याच दिवशी झालेल्या जाहीर लिलावात डझनाला तब्बल 6000 रुपये असा होलसेल दर मिळाल्याने बाजारात हापूसच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे.
यंदा हवामानातील बदल आणि पावसाच्या परिणामामुळे हापूसचे आगमन सुमारे 15 दिवस उशिरा झाले. नेहमीप्रमाणे जानेवारीत बाजारात दाखल होणारा हापूस यंदा फेब्रुवारीत आला आहे. सकाळी परंपरेनुसार पूजन करून लिलावास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीची बोली 1100 रुपयांपासून लागून अखेरीस 6000 रुपयांवर व्यवहार निश्चित झाला.
संचालक संदीप देसाई यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची जवळपास 60 वर्षांची हापूस विक्रीची परंपरा आहे. मालवणसह वेंगुर्ला, देवगड, रत्नागिरी आदी कोकण पट्ट्यातील आंबा थेट बेळगावात आणला जातो. “आमच्याकडे फक्त कोकणातील अस्सल हापूसच विकला जातो. इतर ठिकाणचा आंबा आम्ही विकत नाही; माल संपला तर दुकान बंद ठेवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या दिवशी सुमारे 20 ते 25 बॉक्सची आवक झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. जमखंडी, बागलकोट, हुबळी, धारवाड तसेच गोव्यातील मडगाव व म्हापसा येथील व्यापारीही खरेदीसाठी येथे येतात.
दर सध्या तेजीत असले तरी पुढील पंधरा-वीस दिवसांत आवक वाढल्यानंतर ग्राहकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार हापूस उपलब्ध होईल, असा विश्वास देसाई कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केला.




