बेळगाव लाईव्ह : रायबाग तालुक्यातील चिंचली येथील प्रसिद्ध श्री मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर धारवाड उच्च न्यायालयाने मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
१ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गावात दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तक्रारदार रवींद्र म्हाळू पात्रोट यांनी सरकारला साकडे घातले आहे.
चिंचली येथील मायाक्का देवीची यात्रा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. यात्रेच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अशा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी धारवाड उच्च न्यायालयाने यात्रेच्या काळात मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
रवींद्र पात्रोट यांनी कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव, महसूल विभाग आणि अबकारी आयुक्तांना दिलेल्या अर्जात स्पष्ट केले आहे की, न्यायालयाच्या आदेशानुसार १ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चिंचली शहरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद करणे अनिवार्य आहे. जर प्रशासनाने या काळात मद्यविक्री रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात ‘अवमान याचिका’ दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी बेळगाव, चिकोडी उपविभागाधिकारी आणि अबकारी निरीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले असून, यात्रेदरम्यान शांतता राखण्यासाठी प्रशासन आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




