belgaum

कित्तूरमधील ‘त्या’ हत्येचा लागला छडा : पत्नी आणि मुलानेच कट रचल्याचे उघड

0
726
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कित्तूर तालुक्यातील हिरेहंदिहळ्ळी येथे संपत्तीच्या लोभापायी रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या नावावर असलेली मालमत्ता हडप करण्यासाठी पत्नी कस्तूरी आणि मुलगा किरण यांनीच दोन साथीदारांच्या मदतीने कल्मेश कोटी यांची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कित्तूर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत या प्रकरणातील गूढ उकलले असून चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत आज पोलीस अधीक्षक डॉ. के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि, काही दिवसांपूर्वी हिरेहंदिहळ्ळी येथील मका शेतात कल्मेश यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही हत्या नेमकी कोणी आणि का केली, याचे कोणतेही पुरावे सुरुवातीला उपलब्ध नव्हते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्तूर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मृताच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा तपास केला असता, पत्नी आणि मुलानेच हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. महेश अंबण्णवर आणि मुदकप्पा कोळेकर या दोन आरोपींच्या मदतीने कल्मेश यांचा काटा काढण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मृत कल्मेश यांची पत्नी कस्तूरी कोटी आणि मुलगा किरण कोटी यांनी महेश मडीवाळप्पा अंबण्णवर व मुदकप्पा पद्मराज कोळेकर या दोन साथीदारांच्या मदतीने हा कट रचला होता. आरोपींनी कल्मेश यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह गावातील एका मका शेतात फेकून दिला होता. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कित्तूर पोलिसांनी या चारही आरोपींना २४ फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे न ठेवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता, मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स आणि स्थानिक माहितीच्या आधारे २४ फेब्रुवारी रोजी या चौघांनाही अटक केली. जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने वडिलांचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस तपास पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.