बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या भाजप सत्ताधाऱ्यांनी आणि काही विरोधी नगरसेवकांनी ‘अभ्यास सहली’च्या नावाखाली जयपूरमध्ये जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक आरोप राजकुमार टोपण्णावर यांनी केला आहे.
कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली झालेला हा दौरा म्हणजे निव्वळ पर्यटन असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दौऱ्यादरम्यान महापौरांनीच “बेळगावची कचरा व्यवस्था जयपूरपेक्षा चांगली आहे” असे विधान केल्याचा दाखला देत टोपण्णावर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जर आपली व्यवस्था उत्तम आहे, तर ५० लाख रुपये खर्चून जयपूरला जाण्याची गरजच काय होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, १३५ कोटींचा मूळ प्रकल्प निधीअभावी ७५ कोटींवर येणे हे प्रशासनाचे मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिकेकडे स्वतःच्या कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे नसताना मागील १३ महिन्यांत चंदीगड, इंदूर आणि जयपूर अशा तीन सहलींवर लाखो रुपये उडवण्यात आले आहेत.
या सहलींमधून बेळगावच्या पदरात नेमके काय पडले, याचे उत्तर महापौरांनी द्यावे, अशी मागणी टोपण्णावर यांनी केली. शहराच्या पैशांचा असाच अपव्यय सुरू राहिल्यास जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.




