belgaum

धारवाड उच्च न्यायालय उडवून देण्याची ई-मेलद्वारे पुन्हा धमकी

0
138
high court dhwrd
high court dhwrd bldg file photo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने ई-मेलद्वारे हा धमकीचा संदेश पाठवल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने धावपळ सुरू केली आहे.

उच्च न्यायालयाच्या प्रशासनाला प्राप्त झालेल्या या ई-मेलमुळे सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकामार्फत संपूर्ण संकुलाची तपासणी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गरग पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक नाकेबंदी केली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी केली जात आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा अशा प्रकारे न्यायालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे न्यायालयीन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने कळवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, या धमकीमागच्या सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.

धारवाड येथील उच्च न्यायालयाला मिळालेल्या बॉम्बच्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली असून, पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय इमारत तातडीने रिकामी करण्यात आली असून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.

high court dhwrd
high court dhwrd bldg file photo

धमकीच्या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह अग्निशमन दलाचे जवान न्यायालय परिसरात तळ ठोकून आहेत. संपूर्ण इमारतीची कोपरा न कोपरा तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या गंभीर घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी माहिती दिली की, न्यायालयाच्या परिसरात सध्या केवळ पोलीस कर्मचारी तैनात असून कसून शोधमोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या धमकीच्या संदेशात इतर काही राज्यांचे संदर्भ असल्याने तपासाच्या दृष्टीने सध्या अधिक माहिती उघड करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.