बेळगाव लाईव्ह :ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, प्रशासनिक सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने यमकनमर्डी मतदारसंघातील हंदिगनूर गावात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारतीमुळे गावांच्या विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत हंदिगनूर येथे उभारण्यात आलेल्या नुतन ग्रामपंचायत भवन लोकार्पण केल्यानंतर मंत्री जारकिहोळी बोलत होते. जनतेच्या सहकार्यामुळेच विकास कामे पूर्ण होऊ शकतात. ग्रामपंचायत सदस्यांनी विश्वासात घेऊन काम केल्यास जनतेचा पाठिंबा कायम मिळतो. शिक्षण, मूलभूत सुविधा व ग्रामीण विकासाला प्राधान्य देणे हीच खरी लोकसेवा आहे.
ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत असे सांगून पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटारे यांसारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता करणे हे ग्रामपंचायतींचे मुख्य कर्तव्य असल्याचे मंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले. चांगल्या कामावर टीका होणे स्वाभाविक असून, अशा टीकांमधून अधिक ऊर्जा घेऊन विकासकामे गतीने पूर्ण करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.

सदर कार्यक्रमाला मंत्री महोदयांचे निकटवर्तीय सहाय्यक मलगौडा पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामण्णा गुळी, हंदिगनूर ग्रामपंचायत अध्यक्ष उज्वल सुतार, उपाध्यक्ष दयानंद, सुरेश जाधव, नागेश,
वंटमूरी ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धप्पा होळिकर, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू सुनगार, तसेच पंच हमी योजनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.




