बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाविरोधात पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, मार्केट आणि टिळकवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबवलेल्या विशेष मोहिमेत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या थेट देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आल्याने अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मार्केट पोलिसांनी खंजार गल्ली येथील मोकळ्या मैदानात चालणाऱ्या मटका अड्ड्यावर छापा टाकून गजानन पाटणकर, रसूल शेख आणि राजेश शहापूरकर यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोहम्मद रफी तहसीलदार या मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आले असून चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याच भागात पीएसआय हुसेनसाब केरुप यांच्या पथकाने तैयब इनामदार, कृष्णा पुजारी, मेहबूब तोडेसवार आणि शुभम घोडके यांना अटक केली. हे आरोपी फहीम जिलानी कोतवाल याच्यासाठी मटका बुकी म्हणून काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दुसरीकडे, तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी टिळकवाडी पोलिसांनी आरपीडी क्रॉस आणि रेल्वे गेट परिसरात विशेष शोध मोहीम राबवली. यावेळी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या ओंकार नाईक, अनिल नागप्पागोळ आणि मोहन दांडवाले या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांनी गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी १७,२५० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलीस निरीक्षक परशुराम पूजेरी, विठ्ठल हावन्नवर आणि त्यांच्या पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




