belgaum

बेळगाव महानगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर

0
220
 belgaum


बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या विशेष परिषदेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ९२.३२ लाख रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. कर आणि वित्त स्थायी समितीच्या अध्यक्षा रेखा हुगार यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात शहर विकासासोबतच समाजकल्याणाच्या विविध योजनांवर भर देण्यात आला आहे.

या अर्थसंकल्पात एकूण ४४२.५४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून ४४१.६२ कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने यंदा पर्यावरणपूरक घरांना मालमत्ता करात सवलत देऊन ‘ग्रीन बेळगाव’चा नारा दिला आहे. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना दिला जाणारा १० टक्के मालमत्ता कर सवलतीचा निर्णय या वर्षीही कायम ठेवून त्यांचा सन्मान राखला आहे. महापालिकेच्या पाठीचा कणा असलेल्या सफाई कामगारांसाठी आरोग्य विमा आणि दैनंदिन नाश्त्याची तरतूद हा या अर्थसंकल्पातील सर्वात संवेदनशील निर्णय मानला जात आहे.

सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी या अर्थसंकल्पाचे समर्थन करताना सांगितले की, ८५ टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवून प्रथमच असा शिलकी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.

मात्र, यावर विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते रवी साळुंके यांनी केवळ कागदावर कर वसुली न दाखवता, आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून थकीत कर वसूल करावा, असा सल्ला दिला. जोपर्यंत जुना कर वसूल होत नाही, तोपर्यंत शहराचा विकास केवळ घोषणांपुरता मर्यादित राहील, अशी टीका रियाझ किल्लेदार यांनी केली. अझीम पटवेगार यांनी अर्थसंकल्पावर अधिक सखोल चर्चेची मागणी केली.

महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपमहापौर वाणी जोशी आणि आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.