बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती श्री यल्लम्मा देवी, चिंचली श्री मायाक्का देवी, कक्केरी श्री बिष्टम्मा देवी, कोकटनूर श्री यल्लम्मा देवी आदी प्रमुख यात्रांमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून या यात्रांमध्ये भेसळयुक्त व रसायनमिश्रित गुलाल व इतर रंग तसेच भंडाऱ्याच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे.
यात्रा व धार्मिक उत्सवांसाठी तयार होणाऱ्या भंडाऱ्यात कृत्रिम रंग, हानिकारक रसायने तसेच असुरक्षित अन्नपदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच सार्वजनिक शांततेलाही बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
त्यामुळे फक्त शुद्ध व सुरक्षित भंडाऱ्यालाच परवानगी देण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याही यात्रेमध्ये रसायनमिश्रित भंडाऱ्याचे उत्पादन, साठवणूक, वितरण व वापर करण्यावर सक्त निर्बंध घालण्यात आले आहेत. अन्नसुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, स्थानिक तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष यात्रास्थळी भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असून संबंधित यात्रा समिती व आयोजकांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शहर पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भाविकांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात येणार असून यात्रांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.





