बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात आधीच फलोत्पादन खात्याचे फुल मार्केट सुरू असताना आणखी एक होलसेल फुल मार्केट सुरू करणे नियमाला धरून नाही. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील फुल मार्केटसाठी एपीएमसी मार्केट यार्ड आणि फलोत्पादन खात्याच्या फुल मार्केटच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील फुल व्यापाऱ्यांनी किल्ल्याजवळ होलसेल फुल मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात फुल व्यापारी आणि आमदारांशी आज झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी रोशन प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलत होते.
ते म्हणाले की, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत होलसेल फुल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हा निर्णय घेतला असला तरी कोणतेही सरकारी अथवा खाजगी फुल मार्केट सुरू करायचे असेल तर ते राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटी नियमानुसार सुरू करावे लागते. कारण “फुले ही देखील नियंत्रित वस्तू आहे”. त्यामुळेच फुलांच्या विक्रीवर, त्यांच्या व्यापारावर, बाजार समिती (एपीएमसी) आणि सरकारचे नियम व कायदे लागू असतात. एखादी जागा जर आम्ही अधिसूचित क्षेत्र म्हणून घोषित केले असेल तर त्या ठिकाणी फुलांचा ठोक अथवा किरकोळ व्यापार करता येत नाही.
त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीत कॅम्प येथील फुल मार्केट संदर्भात मी स्थानिक आमदार आणि फुल व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच एपीएमसी मार्केट येथे त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या ठिकाणी जाऊन फुलांचा व्यापार करणाऱ्यांना कोणीही अडवणार नाही. त्या ठिकाणी ते निर्भयपणे व्यापार करू शकतात. या खेरीज बेळगाव शहरात फलोत्पादन खात्याकडून लिलावाच्या माध्यमातून होलसेल फुल मार्केट चालवण्यास दिले जात आहे.
त्या ठिकाणी आम्ही आणखी काही दुकान गाळे निर्माण करून एपीएमसीच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी एक नवी उपफुल बाजार पेठ सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्याला सर्व फुल व्यापाऱ्यांनी अप्रत्यक्ष सहमती दर्शवली आहे. याव्यतिरिक्त फुल व्यापाऱ्यांच्या अन्य काही मागण्या आहे. त्याबाबतीतही सहानुभूतीपूर्वक विचार केला जात आहे, ची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी सांगितले की, कॅन्टोन्मेंट हद्दीत सुरू असलेले होलसेल फुल मार्केट नियमाला धरून नाही ते एपीएमसी कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. तथापि फुल व्यापाऱ्यांची मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे.
त्यांची समस्या, त्रास निदर्शनास आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार कॅन्टोन्मेंट हद्दीतील होलसेल फुल व्यापारी आपला व्यापार फलोत्पादन खात्याच्या मार्केटमध्ये किंवा एपीएमसी मार्केट यार्डमध्ये पुढे सुरू ठेवू शकतात. जनतेची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस एपीएमसीचे सचिव आणि फलोत्पादन खात्याचे संचालक देखील उपस्थित होते. त्यामुळे आता कॅन्टोन्मेंट हद्दीतील फुल व्यापाऱ्यांचे रीतसर परवाने देऊन शहरातील होलसेल फुल मार्केट मध्ये किंवा एपीएमसी मार्केट यार्ड येथे पुनर्वसन केले जाईल असे आमदार असेच बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी स्पष्ट केले



