बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुग्गनट्टी क्रॉसजवळील स्टेट हायवे-२० वर धोकादायक ‘व्हीलिंग’ केल्याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी संबंधित वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन जीप व सात दुचाकींच्या साहाय्याने रस्त्यावर ‘व्हीलिंग’ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या आधारे कारवाई करत मुरगोड पोलिसांनी सात स्वतंत्र गुन्हे नोंदवून सहा वाहने जप्त केली. यात एक सुधारित (मॉडिफाईड) महिंद्रा ओपन जीप, एक महिंद्रा स्कॉर्पिओ, एक महिंद्रा बोलेरो, तीन बजाज पल्सर दुचाकी व एक रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० दुचाकी यांचा समावेश आहे. ही सर्व वाहने न्यायालयात सादर करण्यात आली असून जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे १७ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.
यानंतर उर्वरित चार दुचाकीदेखील जप्त करण्यात आल्या असून संबंधित चालकांना न्यायालयात दंड भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण १२ वाहने या घटनेत सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासात असेही उघड झाले की, यरगट्टी येथील सुरेश गुरुनाथ बजन्त्री (रौडीशीटर) यांच्या चिथावणीवरून ही ‘व्हीलिंग’ करण्यात आली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रकार केल्याचे तसेच त्यांनीच चालकांना हे कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. बजंत्री घटनास्थळी उपस्थित होता.
सर्व चालकांविरोधात खालील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत :
• कलम 281 (बेपर्वा वाहन चालवणे), भारतीय न्याय संहिता 2023
• कलम 285 (रस्त्यावर अडथळा निर्माण करणे), भारतीय न्याय संहिता 2023
• कलम 52, मोटार वाहन कायदा (बेकायदेशीर बदल)
• कलम 184, मोटार वाहन कायदा (धोकादायक वाहन चालवणे)
• कलमे 182(A), 184, 194(A) सह 177, मोटार वाहन कायदा
• कलम 128(A) सह 177, मोटार वाहन कायदा (अधिक प्रवासी वाहतूक)
याशिवाय सुरेश गुरुनाथ बजन्त्री याच्याविरोधातही स्वतंत्रपणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




