बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या किनारी प्रदेशातील गुंतवणूक वातावरण सुधारण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुधारणात्मक उपाययोजना केल्या आहेत, कंपन्या तेथे गुंतवणूक करण्यास कचरत असल्याच्या आरोपांना कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आज सोमवारी फेटाळून लावले.
किनारी कर्नाटकात गुंतवणूक करण्यास कंपन्या कचरत असल्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना राव म्हणाले की, सध्याच्या सरकारने सत्ता हाती घेतल्यापासून या प्रदेशात आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. किनारी पट्ट्यात आता स्थिर आणि सुसंवादी वातावरण आहे. आम्ही अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. विकासात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकताना मंत्री राव यांनी सरकारने किनारी जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला प्राधान्य दिले आहे, तीन पंचतारांकित हॉटेल्सना मंजुरी देण्यात आली आहे. गुंतवणूक प्रस्तावांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करारावर (एमओयू) एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती दिली.
क्योनिक्स मंगळूरमध्ये 50 कोटी रुपये खर्चाच्या आयटी प्रकल्पावर काम सुरू करणार आहे. आता मंगळूर गुंतवणुकीसाठी एक अतिशय आकर्षक जिल्हा म्हणून उदयास येत आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. जातीय तणावाच्या मुद्द्यांवर बोलताना मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, पूर्वीच्या जातीयवादाच्या घटनांमुळे अनेक लोकांवर विपरीत परिणाम झाला होता, परंतु सरकार आता जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहे. कांही संघटना सोशल मीडियाद्वारे द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप करून पोलिस अशा कारवायांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणाच्या बाजूने नाही किंवा विरोधात नाही. जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.

मंत्री प्रियांक खर्गे यांनी आरएसएसची तुलना भूताशी केल्याच्या कथित टिप्पणीवर मंत्री राव यांनी भाष्य करण्यास नकार दिला आपल्याकडे संपूर्ण माहिती नाही आणि हा प्रश्न तुम्ही स्वतः खर्गे यांनाच विचारावा, कसे ते म्हणाले. मुख्यमंत्री बदलाच्या संभाव्य अंदाजांना संबोधित करताना मंत्री राव यांनी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचे वृत्त फेटाळून लावले. पक्षात कोणताही गोंधळ किंवा मतभेद नाही. आम्ही एक आहोत. अशा चर्चा अनावश्यक आहेत आणि सरकारवर त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कांही आमदारांनी नेतृत्व बदलाबाबत केलेल्या विधानांबद्दल माध्यमांच्या प्रश्नांवर ते म्हणाले की, एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलल्यानंतर इतरांनी वेगळे निवेदन देण्याची गरज नाही. राजकीय अटकळांमध्ये पक्षाच्या आमदारांनी गोव्यात रिसॉर्ट बुक केल्याच्या वृत्ताचेही राव यांनी खंडन केले. काहींही बुक केलेले नाही, जर आमदार वैयक्तिक कारणांसाठी किंवा सुट्टीसाठी प्रवास करत असतील तर त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाऊ नये, असे ते म्हणाले. पक्षाच्या उच्चाधिकाऱ्यांनी अटकळांना “पूर्णविराम” देण्याची गरज नाही. सरकारवर कोणतेही संकट नाही, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदावर राहतील का? या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला.



