belgaum

रस्ते खुदाईमुळे होत असलेल्या त्रासाबाबत आमदारांकडे मागणी

0
264
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत सुरू असलेल्या रस्ते खुदाईमुळे व्यापारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ सेठ यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
रामदेव गल्ली, खडे बाजार, समादेवी गल्ली, हंस टॉकीज रोड, नार्वेकर गल्ली, गोंधळी गल्ली, मारुती गल्ली, भेंडी बाजार तसेच परिसरातील व्यापारी भागात सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे प्रचंड धूळ, वाहतूक कोंडी, खोल खड्डे, अपघाताचा धोका आणि पाणीपुरवठा खंडित होणे अशा समस्यांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

असोसिएशनच्या वतीने आमदार असिफ सेठ यांच्याकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या –
• धूळ नियंत्रणासाठी दररोज किमान चार वेळा पाण्याची फवारणी करावी.
• वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अधिक वाहतूक पोलीस तैनात करावेत.
• खोदलेल्या रस्त्यांवर तातडीने तात्पुरते डांबरीकरण करावे.
• रस्ते काम पूर्ण होण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.
• व्यापारी व रहिवासी भागातील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.
• कामात होणारा विलंब टाळण्यासाठी योग्य निरीक्षण व नियंत्रण ठेवावे.


या निवेदनाची गंभीर दखल घेत आमदार असिफ सेठ यांनी तात्काळ बेळगाव महापालिका तसेच प्रशासनातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या संदर्भात मंगळवारी महापालिकेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लग्नसराईचा हंगाम आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, रस्ते खुदाईमुळे निर्माण झालेल्या समस्या तातडीने दूर करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार असिफ सेठ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
व्यापाऱ्यांनी आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले असून, लवकरच परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली आहे.

यावेळी बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, मुकेश खोडा,मुकेश संघवी, राजू पालीवाला, नितेश जैन, लालचंद चप्रू कमलेश खोडा, प्रशांत कलीमणी शाहिद मेमन आदी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.