बेळगाव लाईव्ह : बेळगाव: बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची मुदत संपत असल्याने आता नव्या निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी यासंदर्भात निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी विभागीय आयुक्तांना अधिकृत पत्र धाडले असून, राजकीय वर्तुळात आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
बुधवारी बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विद्यमान महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन निवडणूक वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
आगामी काळासाठी आरक्षणाची स्थिती स्पष्ट झाली असून, महापौरपद ‘सामान्य महिला’ गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर उपमहापौरपद ‘सामान्य’ गटासाठी निश्चित करण्यात आले आहे. यामुळे बेळगावच्या प्रथम नागरिक पदी आता सामान्य गटातील महिलेची वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे.
या निवडणूक प्रक्रियेत एकूण ६५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे निवडून आलेले ५८ नगरसेवक आणि ७ पदसिद्ध सदस्य (आमदार, खासदार आणि मंत्री) यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली आहे. विभागीय आयुक्तांकडून लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.




