बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘सिटीस २.०’ (CITIIS 2.0) योजनेसाठी बेळगावची निवड झाल्याने शहराच्या विकास प्रक्रियेला नवी गती मिळणार आहे. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी महापौर मंगेश पवार यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या पथकाने नुकताच राजस्थानमधील जयपूर शहराचा दौरा केला. या दौऱ्यात कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करणाऱ्या आधुनिक प्रकल्पांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
नगरविकास मंत्रालयाच्या कठीण स्पर्धेत बेळगावने स्थान मिळवले असून, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी आणि युरोपियन युनियनच्या सहकार्याने या योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे.
याच धर्तीवर महापौर मंगेश पवार, सभागृह नेते हनुमंत कोंगाळी आणि नगरसेवकांनी जयपूरमधील कचरा विल्हेवाट प्रकल्प तसेच ‘एअर प्युरिफायर प्लांट’च्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. बेळगावमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

या दौऱ्याबाबत बोलताना महापौर मंगेश पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिटीस २.० योजनेच्या अंमलबजावणीसाठी जयपूरमधील प्रकल्प मार्गदर्शक ठरणार आहेत. विशेष म्हणजे, बेळगावमध्ये राबवल्या जाणाऱ्या काही चांगल्या उपक्रमांची जयपूरमध्येही दखल घेतली जात असल्याचे मंगेश पवार यांनी सांगितले.
जयपूरमधील शाश्वत विकासाची ही मॉडेल्स बेळगावात राबवून शहराच्या स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा मानस असल्याचे हनुमंत कोंगाळी यांनी स्पष्ट केले.




