belgaum

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात विविध संघटना आक्रमक

0
302
 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या कामगार, कृषी आणि आर्थिक धोरणांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ला आज बेळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात सीआयटीयू, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, मजूर युनियन आणि एलआयसी जागृती महासंघासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अस्तित्वात आलेले कामगार कायदे केंद्र सरकार उद्ध्वस्त करत असल्याची टीका यावेळी नागेश सातेरी यांनी केली, तसेच ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करून निरुपयोगी योजना लादल्यामुळे देशातील १२ कोटी कामगार आज रस्त्यावर उतरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान आशा कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेले १० हजार रुपयांचे मानधन गेल्या तीन महिन्यांपासून थकीत असल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

डॉ. शिवाजीराव कागणीकर यांनी ‘मनरेगा’ योजनेतील बदलांवरून सरकारवर तोफ डागली; २००६ मध्ये गरिबांना रोजगाराची हमी देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेतील पंचायत राज अधिकार काढून घेऊन केंद्र सरकार राज्यांना विश्वासात न घेता नवी धोरणे राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या निदर्शनानंतर आपल्या प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला पाठवण्यात आले. या आंदोलनामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.