बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर परिसरात दीड वर्षीय लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना घडली. संशयित महिलेला रंगेहात पकडून नागरिकांनी तिला मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षीय मुलाला एका महिलेनं पिशवीत टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महिलेला पकडले. घटनेची माहिती मिळताच माळ मराठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यापूर्वी फुलबाग गल्ली तसेच अनगोळ परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे न्यू गांधी नगरात पोलिस व स्थानिक नागरिकांमध्ये यावरून गोंधळ निर्माण झाला होता.
माळा मारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी आर गडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत लहान मुलाचे अपहरण करणाऱ्या त्या महिलेला ताब्यात घेतले. सदर महिला पिशवीतून दीड वर्षाच्या लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत असताना तिला रंगेहात पकडण्यात आले होते. सदर महिला कोण आहे या महिलेच्या मागे आणखीकोण कोण आहे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी किती जणांची आहे याचा कसून तपास पोलीस करताहेत.

सुट्टीच्या काळात घराजवळ खेळणाऱ्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिसरात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
तसेच पोलिस प्रशासनानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




