belgaum

‘बुडा’ची धडक मोहीम : ११ एकरवरील बेकायदा लेआउट जमीनदोस्त

0
757
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने (बुडा) बेकायदा लेआउट्स विरोधात युद्ध पुकारले आहे. शहराच्या उपनगरातील शिंदोळी गावात कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेले तब्बल ११ एकर क्षेत्रातील बेकायदा लेआउट आज प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केले.

बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने शहराच्या बाहेरील शिंदोळी गावच्या हद्दीत अनधिकृतपणे साकारलेल्या एका मोठ्या लेआउटवर छापा टाकून कारवाई केली आहे. शिंदोळी येथील सर्व्हे नंबर १३१/१, २, ३, ४, ५ आणि ६ मधील सुमारे ११ एकर जागेत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हे लेआउट तयार करण्यात आले होते.

प्राधिकरणाचे नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेले रस्ते, गटारी आणि इतर पायाभूत सुविधांचे बांधकाम बुडाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने हटवले. नागरिकांनी अशा अनधिकृत लेआउटमध्ये भूखंड खरेदी करून आपली फसवणूक करून घेऊ नये, असा इशारा यावेळी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या धडक कारवाईत बुडा आयुक्त शकील अहमद यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. घटनास्थळी टीपीएम बी. व्ही. हिरेमठ, एईई मंजुश्री, टीपी शिवकुमार, जेई प्रसन्न, बाळिगड्डी, सर्व्हेअर विद्या आणि पोलीस कर्मचारी कडेकोट बंदोबस्तासह उपस्थित होते. तसेच निलजी ग्रामपंचायत विकास अधिकारी श्रीदेवी हिरेमठ यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.

येणाऱ्या काळात बेळगावच्या आसपासचे कोणतेही बेकायदा लेआउट सहन केले जाणार नाहीत आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्त शकील अहमद यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.