बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भाषेबद्दलच्या चर्चासत्रासह पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित उपरोक्त चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शन गणपत गल्ली, बेळगाव येथील वाचनालयाच्या सभागृहामध्ये होणार आहे.
प्रदर्शनात गोवा बुक फेस्टिवलमध्ये खरेदी केलेल्या 200 हून अधिक पुस्तके मांडली जाणार आहेत. तरी भाषा व मराठी पुस्तक प्रेमींनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव व कार्यवाह लता पाटील यांनी केले आहे.
अभिजात मराठी संस्थेतर्फे वाचक महोत्सवाचे आयोजन
बेळगाव-येथील अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने “वाचक महोत्सवाचे ” आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात दहाहून अधिक वाचक “आपल्याला आवडलेले पुस्तक” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चैतन्य हलगेकर हे राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे अध्यक्ष डॉ सध्या देशपांडे व कार्यवाह अनंत लाड यांनी कळविले आहे




