बेळगाव लाईव्ह : गोव्यातील प्रसिद्ध बागा बीच परिसरात सुरू असलेल्या एका अपार्टमेंटच्या इमारतीत कामासाठी गेलेल्या बेळगावच्या युवकाचा लिफ्टच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावाचा रहिवासी विवेक विजय हुद्दार (वय २५) याचा मृत्यू झाला.
विवेक हा व्यवसायाने कंत्राटदार असून, गोव्यातील बागा बीचजवळील बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये स्लाइडिंग खिडक्या बसवण्याचे काम करत होता. सोमवारी पहाटे सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी जात असताना तो चुकून सहाव्या मजल्यावरून थेट लिफ्टच्या खड्ड्यात पडला.
या अपघातात विवेक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी मृतदेह बेळगावातील शाहूनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

मृत विवेकच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. रात्री १० वाजता कंग्राळी बुद्रुक गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेची नोंद गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. रोजीरोटीसाठी गोव्यात गेलेला तरुण अपघातात मृत्युमुखी पडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.




