बेळगाव लाईव्ह :
बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने (Belgaum City Corporation) चार महिन्यांनंतर पुन्हा एकदा कुत्र्यांचे निर्बीजीकरण अभियान सुरू केले आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून रखडलेली ही मोहीम अखेर सुरू होताच अवघ्या दोन दिवसांत १२ भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत केवळ शस्त्रक्रियाच नव्हे तर भटक्या कुत्र्यांना अँटी-रेबीज लसीकरणही करण्यात येत आहे. यामुळे शहरात रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्बीजीकरण आणि लसीकरण अनिवार्य आहे.
मात्र, प्रत्यक्षात केवळ शस्त्रक्रिया सुरू असून ‘फीडिंग झोन’ अर्थात कुत्र्यांना अन्न देण्यासाठी निश्चित क्षेत्रांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

शहरातील अनेक भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तक्रारी, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आणि नागरिकांमधील अस्वस्थता वाढत असताना, ही मोहीम नियमित आणि व्यापक स्वरूपात राबवली गेली नाही, तर समस्या केवळ तात्पुरतीच आटोक्यात येईल, अशी चिंता व्यक्त होत आहे.
बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या केवळ आरोग्याशीच नव्हे तर सार्वजनिक सुरक्षिततेशी निगडित असल्याने, निर्बीजीकरणासोबतच फीडिंग झोन, जनजागृती आणि सातत्यपूर्ण सर्वेक्षण या सर्व बाबी तातडीने राबवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



