belgaum

विविध ६ कारवायांमध्ये ८ आरोपींना बेड्या

0
245
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी बेळगाव पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात टाकलेल्या छाप्यांमध्ये मटका जुगार, गांजा सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या एकूण ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालासह आरोपींवर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टिळकवाडी पोलिसांनी समृद्धी कॉलनी परिसरात छापा टाकून मटका जुगार चालवणाऱ्या विनोद अशोक होसूरकर (४२, रा. अनंद नगर, वडगाव) याला अटक केली. तो गोळा केलेले पैसे मारुती हंदकर याला देणार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

दुसरीकडे, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मच्छे गावाजवळील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या शिवानंद फकिरप्पा बोरक्कनवर (३२, रा. मुतवाड) याला ताब्यात घेतले. त्याने अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाल्याने त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. या अंतर्गत उद्यमबाग परिसरातील राजाराम नगर आणि मजुगाव परिसरात रस्त्याच्या कडेला मद्यपान करणाऱ्या सतीश बेन्नाळ, उमेश पालककर, विक्रम हंडे आणि प्रसाद गावडे या चौघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच खडेबाजार हद्दीतील रामलिंगखिंड गल्लीत मद्यप्राशन करणाऱ्या अक्षय मोरे याला, तर मारीहाळ हद्दीत भारत पेट्रोल पंपाजवळ मद्यपान करणाऱ्या अनिल यड्डी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या यशस्वी कारवायांमध्ये सहभागी असलेले पीआय, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.