बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये पुन्हा एकदा भाषेच्या नावाखाली कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी केली आहे. उद्यमबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेत केरळहून बदली होऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला कन्नड येत नसल्याच्या कारणावरून अक्षरशः छळण्यात आले. या प्रकारामुळे महिला कर्मचारी प्रचंड दहशतीखाली असून बँकिंग वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी मागील वर्षी बदली होऊन बेळगावला रुजू झाली आहे. तिला केवळ मल्याळम आणि इंग्रजी भाषा अवगत असल्याने तिला कन्नड बोलता येत नाही.
या मुद्द्यावरून कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेत घुसून मोठा गोंधळ घातला. या महिलेला आणि बँक व्यवस्थापकाला केवळ कन्नड येत नाही म्हणून सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर या अपमानास्पद वागणुकीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करून तिला मानसिक त्रास देण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेचा पती परदेशात असल्याने ती बेळगावमध्ये एकटीच वास्तव्यास आहे. या घटनेनंतर तिला अज्ञात क्रमांकावरून फोन करून धमकावले जात असल्याने ती भीतीच्या छायेत वावरत आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करून एखाद्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या अपमानित करण्याचे धाडस या संघटनांकडे येते कुठून, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला कोणत्याही राज्यात नोकरी करण्याचा आणि जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी भाषिकांनंतर आता इतर प्रांतांतील सरकारी कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले जात आहे. कायदे आणि नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का आणि पोलीस प्रशासन या गुंडगिरीला आवर का घालत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.




