बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (बिडीसीसी) बँकेच्या प्रतिमेला तडा देण्याचे विरोधकांचे प्रयत्न आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी हाणून पाडले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याच्या वावड्या केवळ राजकीय द्वेषातून उठवण्यात येत असून, प्रत्यक्षात बँकेने प्रगतीचा नवा टप्पा गाठला असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. अफवा पसरवून ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध आता पोलीस कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. बँकेतून १००० कोटींच्या ठेवी कमी झाल्याचा दावा पूर्णपणे बनावट असून, गेल्या तीन महिन्यांत ठेवींमध्ये ५०० कोटींची वाढ होऊन हा आकडा ५५७५ कोटींवर पोहोचला आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्या महांतेश कडाडी यांना नोटीस बजावण्यात आली असून, बँकेची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे अण्णासाहेब जोल्ले यांनी ठणकावून सांगितले.
बँकेच्या कर्जवाटपाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाचा ओघ वाढवण्यात आला आहे. ३०० कोटींचे विविध कर्ज, १२० कोटी साखर कारखान्यांना आणि १२०० कोटींचे बिगरशेती कर्ज वितरित करण्यात आले असून सर्व व्यवहार पारदर्शक आहेत. इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर शून्य टक्के व्याजाने कर्जवाटप सुरू असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक सदैव तत्पर असल्याचे अण्णासाहेब जोल्ले यांनी नमूद केले.
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी रमेश कत्ती आणि महांतेश कडाडी यांच्यावर कडाडून टीका केली. जयशील शेट्टी यांना दिलेल्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना ते म्हणाले की, १०० कोटींहून अधिक मूल्य असलेल्या ४ एकर कमर्शियल जमिनीच्या बदल्यात हे कर्ज देण्यात आले असून, संबंधितांनी ८ कोटींचे व्याजही भरले आहे.

रमेश कत्ती केवळ वैयक्तिक आकसापोटी बँकेची बदनामी करत असून, कडाडी यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बँकेच्या कर्मचाऱ्यांचे हित जपतानाच लक्ष्मी नारायण कारखान्याकडून १४ कोटींची वसुली करण्यात आली असून कोणतीही थकबाकी शिल्लक नसल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. पडद्यामागून बँक बंद पाडण्याचे कारस्थान रचणाऱ्यांना आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भालचंद्र जारकीहोळी यांनी दिला.
यावेळी उपाध्यक्ष राजू कागे, अरविंद पाटील, चन्नराज हट्टीहोळी राहुल जारकीहोळी,आणि बँकेचे इतर संचालक उपस्थित होते.




