बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शहापूर स्मशानभूमी विकास कामांसाठी आराखडा बनवण्याबरोबरच स्मशानभूमी सुधारणांसाठी राखीव निधी देखील उपलब्ध असताना स्मशानभूमीतील विकासाची कामे मात्र योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून महापौर मंगेश पवार यांनी आपला कार्य कालावधी पूर्ण होण्यापूर्वी या स्मशानभूमीतील विकास कामे त्वरने पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव महानगरपालिकेचे काम केंव्हा सुरू होईल आणि केंव्हा पूर्ण होईल? याची कोणीच खात्री देताना दिसत नाही. स्मार्ट सिटीतील कामे 8 वर्षे उलटले आले तरीही पूर्ण झालेली नाहीत. अशाच पद्धतीने शहरातील अनेक भागात विकास कामे खोळंबली आहेत. त्यातच शहापूर स्मशानभूमीतील विकास कामांसाठी बनविण्यात आलेला आराखडा कागदावरच राहिला आहे.
स्मशानभूमी सुधारणांसाठी महापालिकेचा राखीव निधी उपलब्ध असतानाही स्मशानभूमीतून विकासाची कामे योग्य त्या पद्धतीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणी -गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शहापूर स्मशान भूमीतील दोन्ही निवाऱ्यावरील पत्रे खराब होऊन अत्यंत धोकादायक बनले होते त्यापैकी एका निवाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
तथापी हे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक वेळ लागला आहे. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून नव्याने निवारा, अंत्यदाहिनी शेगड्या आणि चौथर्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कामासाठी 31 लाख 70 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. यामधील निवारा आणि चार अंत्यविधी शेगड्यांचे काम पूर्ण झाले तरी मंजूर झालेल्या निधीतून बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सदर काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला दीड महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र निवारा आणि अंत्यविधी शेगड्यांचे काम उरकण्यासाठीच ठेकेदाराने तीन महिन्यांचा वेळ घेतला आहे.
यातच नव्याने उभारण्यात आलेल्या निवाऱ्यावर शेजारील धोकादायक झाड कोसळल्याने संपूर्ण निवारा कोसळला आहे. महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक नितीन जाधव यांनी स्मशानभूमीला भेट देऊन कोसळलेला निवारा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले आहे. नवीन निवारा उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. महापौर मंगेश पवार यांनी यासाठी जातीने विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र निधी मंजूर झालेला असतानाही निवाऱ्याचे काम प्रलंबित राहिले आहे. नवा निवारा लवकरात लवकर उभारण्यात आला नाही तर पावसाळ्यात नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. निवाऱ्या अभावी जमिनीवर अंत्यविधी करण्यासाठी जास्त लाकडे लागत असल्यामुळे नागरिकांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
दुसरीकडे वडगाव स्मशानभूमीत लाकडांची कमतरता भासत असल्यामुळे वडगाव परिसरातील नागरिकांना शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी यावे लागत आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत अंत्यविधीचे प्रमाण वाढले असून सध्या दिवसाकाठी 4 ते 6 अंत्यविधी होत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहापूर स्मशान भूमीच्या सुधारणे संदर्भात आराखडा बनविला आहे.शहापूर स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र स्मशानभूमी सुधारण्याचा आराखडा कागदावरच राहिला आहे.

स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सोय दिसून येत नाही. यापूर्वी स्मशानभूमीच्या विकास कामांसंदर्भात कार्यरत असलेल्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने विविध संघ-संस्था तसेच दानी व्यक्तींच्या सहकार्यातून विविध प्रकारची विकास कामे या ठिकाणी राबविण्यात आली. आजही अनेक संस्था स्मशानभूमीतील विकास कामांबाबत सहकार्य करण्यास तयार आहेत. तथापी महापालिकेचा स्मशानभूमी विकास आराखडा अन्य सेवाभावी सामाजिक संस्थांच्या सहकार्यात अडथळा ठरला आहे.
सध्या स्मशानभूमीत नव्या पद्धतीचे दिवे बसवतानाही योग्य त्या प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. स्मशानभूमीच्या जागेत एकमेकांजवळ दिवे लावले जात असताना दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वार आणि मंदिराजवळ दर्शनीय ठिकाणी नवे दिवे लावण्याच्या मागणीला मनपाच्या अधिकाऱ्यांनी नकार दर्शविला आहे. यावरून मनपाचे अधिकारी स्मशानभूमीतील विकास कामांसंदर्भात मनमानी करत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापौर मंगेश पवार यांनी आपला कार्य कालावधी पूर्ण होण्यापूर्वी शहापूर स्मशानभूमी येथील प्रलंबित विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत आणि जनतेचा दुवा घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.




