बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वाढत्या पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ज्या मल्टी-स्टोरे पार्किंग प्रकल्पाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती, तो प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. कोणतीही अधिकृत घोषणा न करता हा निर्णय घेतल्याने शहरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बापट गल्ली येथील बेळगाव महानगरपालिकेच्या विद्यमान पार्किंग जागेवर प्रस्तावित होता. २०२३ साली आमदार राजू सेठ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती व्यापारी भागातील वाहतूक कोंडी सुटेल, पार्किंगची शिस्त लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती.
मात्र भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नाही. उलट, स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी अरुंद रस्ते, आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि प्रवेश-निर्गमन व्यवस्थेतील अडचणींचा मुद्दा उपस्थित करत प्रकल्पाला विरोध केला. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत बापट गल्ली येथील जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर खानजार गल्ली येथे पर्यायी जागेची पाहणी करण्यात आली. त्यामुळे प्रकल्प नव्या ठिकाणी साकार होईल, अशी पुन्हा एकदा आशा निर्माण झाली. मात्र आता “जागेअभावी आणि तांत्रिक अडचणी” ही कारणे देत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे—जर २०१२ पासून सुरू असलेला प्रकल्प १४ वर्षांनंतरही प्रत्यक्षात उतरू शकत नसेल, तर शहरातील दीर्घकालीन पार्किंग नियोजन नेमके कोणाच्या जबाबदारीवर आहे?


आज बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठा, व्यापारी गल्ल्या, सरकारी कार्यालय परिसर आणि रुग्णालयांच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांच्या दुतर्फा बेशिस्त पार्किंग, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण ही दैनंदिन समस्या बनली आहे.
मल्टी-स्टोर पार्किंगसारखा महत्त्वाचा प्रकल्प रद्द झाल्याने आता नागरिकांमध्ये ‘फक्त भूमिपूजन आणि घोषणा, प्रत्यक्षात शून्य काम’ अशी भावना बळावत आहे. स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतूनही जर मूलभूत गरज असलेला पार्किंग प्रकल्प साकार होत नसेल, तर भविष्यात शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे काय होणार, हा प्रश्न बेळगावकरांसमोर उभा आहे.
कालानुक्रम: बापट गल्ली मल्टी-लेव्हल पार्किंग – प्रत्यक्षात न उतरलेला प्रकल्प
२०१२ – खासगी सहभागातून प्रस्ताव
२०१२ साली PPP (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर बापट गल्ली येथे मल्टी-लेव्हल पार्किंगचा प्रस्ताव मांडण्यात आला. दोन कंपन्यांनी रस दाखवला होता.
२०१७ – निविदा, पण अडथळे सुरू
मार्च २०१७ मध्ये बांधकामासाठी निविदा काढण्यात आली. मात्र कंत्राटदारांचा कमी प्रतिसाद आणि इतर अडचणींमुळे प्रकल्प रखडला.
२०२१ – स्मार्ट सिटी अंतर्गत पुनरुज्जीवन
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत G+5 मल्टी-स्टोरे पार्किंगचा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात आला.
२०२३ – भूमिपूजन
सप्टेंबर २०२३ मध्ये १२० वाहनांच्या क्षमतेच्या पार्किंग प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
२०२४ – कामाला सुरुवातच नाही
भूमिपूजनानंतर १० महिने उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही.
२०२५ – विरोध आणि जागा बदलाचा विचार
स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी प्रकल्पाला विरोध केला. नंतर खानजार गल्ली येथे स्थलांतराची चर्चा झाली.
२०२६ – पुन्हा विलंब
२०२६ च्या सुरुवातीला निविदा प्रक्रियेतील विलंबाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला, मात्र अखेरीस प्रकल्प रद्द करण्यात आला.



