belgaum

५० एकरातील जंगल उद्ध्वस्त काय म्हणाले वन अधिकारी

0
426
Forest dept
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बडाल अंकलगी परिसरात विकासाच्या नावाखाली निसर्गाची क्रूर कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे प्रस्तावित सोलर प्लांट उभारण्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय सुमारे ५० एकर क्षेत्रातील वनसंपत्ती मुळासकट उखडून फेकण्यात आली आहे.

या निसर्ग हत्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वरदहस्त असल्याचा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बडाल अंकलगी येथील ऐतिहासिक कौरीगुड्डा डोंगर परिसर जैवविविधतेने नटलेला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने हजारो वृक्षांचा बळी देण्यात आला. विशेष म्हणजे, हा प्रकार बाहेरून कोणाला दिसू नये यासाठी रस्त्याकडील झाडे तशीच ठेवून डोंगराच्या आतील भागातील दाट जंगल नष्ट करण्यात आले आहे.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे होती, ज्यांची तस्करी झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आणि अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे हे आश्रयस्थान आता उजाड झाले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा वन अधिकारी क्रांती यांनी चौकशीचे चक्र वेगाने फिरवली आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारी जमिनीवरील वृक्षतोडीसाठी रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे, मात्र या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले आहे.

सहाय्यक वनसंरक्षकांमार्फत या घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून, ही जमीन वनविभागाची आहे की ‘गायरान’ याचीही पडताळणी सुरू आहे. सध्या वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन सुरू असलेली वृक्षतोड थांबवली असून, या गुन्ह्यातील दोषींवर कडक कारवाईची ग्वाही दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.