बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात किरकोळ कारणावरून लॉरी चालकावर चाकूने हल्ला करून पसार झालेल्या टोळीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. दहशत माजवणाऱ्या या गुंडांना पोलिसांनी शोधून काढले असून पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या कारवाईची माहिती दिली.
बी. शंकरानंद मूर्ती चौकात घडलेल्या या हल्ल्या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी सखोल तपास करून चार जणांना ताब्यात घेतले. शिनोळीहून बेळगावकडे येत असताना लॉरी चालकाने स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, ज्याचा राग मनात धरून स्कुटीवरील तरुणांनी वाद उकरून काढला.
‘आमचा जीव घेतो का?’ असा जाब विचारत आरोपींनी लॉरीचा पाठलाग केला आणि दगडफेक केली. या झटापटीत आरोपींची स्कुटी एका कारला धडकल्याने संताप अनावर होऊन अथर्व गुंडू उसूलकर, प्रशांत, नागेश डांगे आणि नीलकंठ मुरगुड यांनी लॉरी चालक अयाज अहमद सवणूर याच्यावर चाकूने वार केले, असे भूषण बोरसे यांनी सांगितले.
ही घटना उघडकीस येताच कॅम्प पीआय आनंद आणि सीसीबी पीआय नंदीश यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. शहरातील वाढती चाकू हल्ला प्रकरणे गांभीर्याने घेत भूषण बोरसे यांनी ‘चाकू विरोधी’ विशेष मोहिमेची घोषणा केली आहे.
अशा प्रकारची गुन्हेगारी वृत्ती ठेचून काढण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.





